
शेगाव प्रतिनिधी —शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान हे जागतिक दर्जाचे स्वच्छ, सुंदर व सेवाभावी संस्थान असून देशात यासारखे दुसरे उदाहरण आढळत नाही. असे प्रतिपादन वृंदावन निवासी कथावाचक उज्वल श्रीकृष्ण महाराज यांनी केले.
उज्वल श्रीकृष्ण महाराज यांनी २४ मार्च रोजी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की स्वच्छतेच्या बाबतीत शेगावचे संस्थान अतिशय उच्च दर्जाचे असून संपूर्ण देशात इतकी स्वच्छ व सुबक व्यवस्था अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधा व्यवस्थापन आणि शिस्तबद्धता ही अत्यंत उल्लेखनीय आहे.
ते पुढे म्हणाले की देशातील सर्वात मोठ्या महाप्रसाद व्यवस्थांपैकी एक व्यवस्था येथे असून लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर भक्तांची सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.
सेवाभावी वृत्तीने कार्य करणारी ही संस्था समाजासाठी एक आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान उज्वल श्रीकृष्ण महाराज यांची कथा शेगाव तालुक्यातील श्री विद्यांचल माता मंदिर संस्थान येथे १९ मार्चपासून सुरू असून कथेदरम्यान २४ मार्च रोजी त्यांनी आपल्या मातोश्रींसह श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनावेळी ते भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रामेश्वर येथील आचार्य रामेश्वर दास कृष्णदास, दुर्गासिंह लोधी, भाजपा नेते विजय भालतडक तसेच पत्रकार ज्ञानेश्वर ताकोते यांची उपस्थिती होती.







