शेगाव : एसबीआय कॉलनी परिसरात झालेल्या एकाच अवकाळी पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल साचल्यामुळे पायी चालणे देखील कठीण झाले आहे, तर दुचाकी वाहन चालवणे धोकादायक बनले आहे.

आज सकाळी मुलांना शाळेत सोडताना पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर चिखल आणि खड्डे असल्यामुळे अनेक मुलांचे शूज चिखलाने भरले. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था खराब असून वारंवार नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. आज सकाळी या रस्त्यावर दोन जण दुचाकीवरून घसरून पडले असून त्यांना दुखापत झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
एसबीआय कॉलनीमधील इतर काही भागात मुरूम टाकून रस्ते काही प्रमाणात लेव्हल करण्यात आले आहेत. मात्र या भागात रस्ता खोदून ठेवल्यागत झालेला असून फक्त वरून माती टाकण्यात आली आहे. योग्य प्रकारे लेव्हलिंग न केल्यामुळे पावसात रस्ता चिखलमय झाला आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावर मुरूम टाकून योग्य प्रकारे लेव्हलिंग करावे, तसेच कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.










