Home महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून घरातून निघालेली मुलगी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित; दोन्ही युवक-युवती...

सोशल मीडियाच्या माध्यमातून घरातून निघालेली मुलगी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित; दोन्ही युवक-युवती पालकांच्या ताब्या

16
0

दिनांक 17/07/2026 रोजी रेल्वे नियंत्रण कक्षामार्फत ट्रेन क्रमांक 12809 डाउन हावडा–मुंबई एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून एक मुलगा व एक मुलगी घरातून पळून जात असल्याची माहिती एका जागरूक प्रवाशाने नियंत्रण कक्षाला दिली. सदर माहिती प्राप्त होताच नियंत्रण कक्षाने शेगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यास तात्काळ कळविले.

माहिती मिळताच ड्युटीवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुनील कळवलकर व पोलीस हवालदार HC/14 संजय चव्हाण यांनी तात्काळ संबंधित ट्रेन अटेंड करून मुलगा व मुलगी यांना सुरक्षित ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे आणले.

चौकशीदरम्यान मुलाने त्याचे नाव मनोज महानंद (रा. ओडिशा) असे सांगितले. तसेच त्याची व संबंधित मुलीची ओळख इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे झाली असून त्यानंतर दोघांनी एकत्र घरातून निघाल्याची माहिती दिली.

पुढील पडताळणीमध्ये संबंधित मुलगी ठाणे शहर परिसरातून बेपत्ता (Missing) असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याबाबतची माहिती तात्काळ ठाणे शहर पोलीस यांना देण्यात आली. आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर मुलगा व मुलगी या दोघांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले.

सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर व उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग, मनमाड श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सदर प्रकरणाचा तपास व चौकशी ASI/76 सुनील कळवलकर, ASI अलका अढाळे, पोलीस अंमलदार रेखा वानखेडे, ज्योती खिराडे तसेच HC/14 संजय चव्हाण यांनी केली.

याप्रसंगी प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात अनेक मुले सोशल मीडियाचा अविचाराने वापर करत असल्याने अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर, सोशल मीडिया संपर्कांवर आणि ऑनलाइन हालचालींवर नियमित लक्ष ठेवावे. मुलांशी सातत्याने संवाद साधून सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे. वेळेवर जागरूकता आणि संवाद यामुळे अनेक अनिष्ट घटना टाळता येऊ शकतात.”

लोहमार्ग पोलीस, शेगाव यांच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया वापरावर नियमित लक्ष ठेवावे, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्काबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व रेल्वे प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलीस किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. नागरिकांच्या सतर्कतेमुळेच अशा घटना वेळीच रोखणे शक्य होत आहे.

Previous articleश्री ग.म.इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये सुयश शेगांव
Next articleमोबाईल चार्जिंगला लावून झोपणे पडले महाग; GRP शेगावने तांत्रिक तपासातून चोरीचा गुन्हा उघड केलाअमरावती येथून चोरीस गेलेला मोबाईल जप्त; प्रवाशांनी सतर्क राहण्याचे GRP चे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here