शेगाव, दि. 11 जून 2026 – प्रभाग क्र. 9 मधील एस.बी.आय. कॉलनी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि सुरू असलेल्या ड्रेनेज कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या वतीने अरविंद रामदास इंगळे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
निवेदनानुसार, एस.बी.आय. कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ 30 ते 40 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याचे पाणी व इतर दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच प्रभागातील ड्रेनेज कामांमुळे अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वान प्रकल्प कार्यालय ते संत गजानन महाराज इंग्लिश कॉन्व्हेंट परिसरापर्यंतचा रस्ता खराब झाल्याने विद्यार्थी, पालक, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात अपघात होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे, ड्रेनेजची कामे तातडीने पूर्ण करणे आणि खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 9 मधील नागरिकांच्या या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी अरविंद रामदास इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनिल हरीभाऊ लांजुळकर, श्रीमती सिंधुताई गावंडे, प्रवीण शेषराव देशमुख, प्रमोद श्रीराम उगले, प्रियंका अनिल सावळे, प्रल्हादराव बाबुराव देशमुख, कृष्णाराव बाबुराव देशमुख, गोपाल जोत, नितीन मनोहर कळमसरे, प्रकाश नामदेव निखाडे, सौ. सुनंदा संजय चितोडे, सुधाकर किसनराव इंगळे, प्रफुल चंद्रभान साबळे, रामकृष्ण पांडे, संदीप रामभाऊ विचे व जितेंद्र इंगळे आदी नागरिक उपस्थित होते.






