
शेगांव:(प्रतिनिधी)*सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शना मध्ये संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन समाज कल्याणाच्या प्रति सदैव कटीबद्ध आहे. रक्तदान हे असे कार्य आहे जे जीवन वाचवतेच असे नव्हे तर मानवतेची भावनाही सुदृढ करते. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी दिलेल्या “रक्त नाड्यांमध्ये वहावे नाल्यांमध्ये नको” या दिव्य संदेशामधून प्रेरणा घेऊन या उपक्रमाचा मिशनद्वारे शुभारंभ 4 (चार) दशकापासून करण्यात आला असून आजही त्याच भावनेतून रक्तदानामधून मानवतेचे कार्य अविरतपणे चालू आहे. आजवर मिशनद्वारे 14 लाख 50 हजार युनिट रक्तदान करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे साफसफाई अभियानामध्ये रेल्वे स्टेशन, सरकारी दवाखाने, बस स्टँड, शहरातील तसेच ग्रामिण भागातील रस्ते इत्यादीची तसेच नदी-नाले-ओढे, तलावांची अमृत प्रोजेक्ट द्वारे साफ सफाई केली जाते, वृक्षारोपण सोबत वननेस वन द्वारे वनांची निर्मिती केली जात आहे, त्वद्वत आरोग्यनिदान, नेत्र तपासणी शिबिरं नियमितपणे घेण्यात येतात. त्याचप्रमाणे निसर्गाच्या अकस्मात झालेल्या अतिवृष्टी, भूकंप, पुरपीडितग्रस्त नागरिकांना नेहमी मदत केली जाते इत्यादी सामाजिक कार्य चॅरिटेबल फौंडेशन च्या माध्यमातून नेहमी होत असतात. मानवतेची निस्वार्थ सेवा या मूळ उद्देशाने या सेवेचा प्रवास सतत व समर्पित भावनेने चालू आहे.
मिशनच्या या प्रयत्नांची समाज व सरकार कडून नियमित प्रशंसा केली जात आहे. डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने स्वातंत्रदिन व भीमगर्जना न्यूज वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भीमगर्जना राष्ट्र भूषण पुरस्कार 2026 चे मलकापूर येथील महेश भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर आयोजनामध्ये मानव सेवेच्या उत्कृष्ट योगदानाप्रित्यर्थ संत निरंकारी मिशनला भीमगर्जना "राष्ट्रभूषण पुरस्कार 2026" देऊन गौरविण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे प्रेस मीडिया सहायक शिवहरी महादेव वानरे, रमेश पानझाडे, विठ्ठल वायझोडे शाखा शेगांव व रवींद्र गव्हाळे सेवादल इंचार्जे,अजय वानखडे शाखा मलकापूर यांनी हा सन्मान मिशनच्या वतीने स्विकारला.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी 115 मान्यवरांना राष्ट्र भूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला बुलढाणा येथील प्रसिद्ध धम्मगिरी विहाराचे भंते स्वरानंद यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब दामोदर ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योगपती हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दामोदर शर्मा शेतकरी नेते, वीरसिंह दादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार, दिलीप आढाव प्राचार्य विद्या विकास विद्यालय, एड. नेमीचंद धूत ज्येष्ठ विधीज्ञ, हे होते.




