जय तुळजाभवानी कावड मंडळाचा प्रेरणादायी जनसेवा उपक्रम
महागड्या डीजेवरील खर्चाला फाटा देत समाजोपयोगी वस्तू आणली

शेगाव : उत्सव आणि मिरवणुकांमध्ये महागड्या डीजेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची परंपरा असताना, स्थानिक मोदीनगर येथील जय तुळजाभवानी कावड मंडळाने समाजासमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. मंडळाने डीजेवरील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्याच निधीतून नागरिकांच्या अत्यावश्यक सेवेसाठी अत्याधुनिक शवपेटी व स्टीलची तिरडी उपलब्ध करून दिली. या समाजोपयोगी उपक्रमाचे रविवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मोदीनगर येथील सोपीनाथ महाराज मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात अत्याधुनिक शवपेटी व स्टील तिरडीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. जय तुळजाभवानी कावड मंडळातर्फे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक उत्सव साजरे करतानाच समाजाच्या गरजा ओळखून मंडळाने केलेल्या या विधायक कार्याचे उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी कौतुक केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद सेठ अग्रवाल, शैलेंद्रदादा पाटील, पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, नगरसेवक महेश काळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुचिताताई संदीप काळे, नगरसेवक रवींद्र उमाळे, बांधकाम सभापती अंकुशबापू देशमुख, नगरसेवक राजेशजी अग्रवाल, पैलवान विजय बुच, चंद्रकांतभाऊ घोराळे, संतोषभाऊ घाटोळ, माजी नगरसेवक संदीप काळे, शिवसेना शहराध्यक्ष शुभम ढगे-पाटील, कावड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चेतन राऊत-पाटील, केशव लांजुळकर, सारंगधर बारहाते, सोपान जाधव, पंकज कौलकार, राजू केनकर, कैलास नवलकार यांच्यासह मोदीनगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष शुभम ढगे-पाटील यांनी जय तुळजाभवानी कावड मंडळाच्या विविध सामाजिक व समाजहिताच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. मंडळाने यापूर्वीही डीजेविरहित मिरवणुकीच्या माध्यमातून प्रबोधन, विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती तसेच अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता समाजासाठी काहीतरी कायमस्वरूपी व विधायक निर्माण करण्याचा मंडळाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार नानाराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जय तुळजाभवानी कावड मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सव तसेच कावड यात्रेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या वर्गणीच्या रकमेतून समाजोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याची परंपरा मंडळाने सातत्याने जोपासल्याचे त्यांनी सांगितले.
शेगाव शहरासाठी अत्याधुनिक शवपेटीची नितांत आवश्यकता असल्याचे सांगताना नानाराव पाटील यांनी नमूद केले की, शहरात उपलब्ध असलेल्या काही शवपेट्या नादुरुस्त असून त्या वजनानेही जड आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करताना अनेक व्यक्तींची आवश्यकता भासते. मात्र, जय तुळजाभवानी कावड मंडळाने उपलब्ध करून दिलेली नवीन अत्याधुनिक शवपेटी हलक्या वजनाची व अधिक सोयीस्कर रचनेची आहे. कमी मनुष्यबळाच्या सहाय्यानेही तिचा सहज वापर करता येणार असल्याने गरजेच्या वेळी ती नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भविष्यात नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचाही संकल्प व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी सर्वप्रथम ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची कबुली सोपीनाथ महाराज सेवा समितीच्या वतीने सारंगधर बारहाते यांनी दिली. त्यांच्या या पुढाकाराचे उपस्थितांनी स्वागत केले.
चौकट :-मोदीनगरवासीयांच्या उत्साहातून जनसेवेचा आदर्श
उत्सवांमध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच रकमेतून समाजासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देण्याचा जय तुळजाभवानी कावड मंडळाचा हा उपक्रम निश्चितच इतर मंडळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. “उत्सवातून जनसेवा” हा आदर्श मोदीनगरवासीयांनी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवला असून, मनोरंजनापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारा हा उपक्रम काळाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.






