‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ संकल्पना
भ्रष्टाचाराची माहिती देण्याचे आवाहन ; संपर्क क्रमांक जारी
बुलढाणा,दि.४ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणाच्या वतीने दिनांक २७ ॲाक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यकमांचे आयोजन करुन जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाची “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” हि संकल्पना ठेवण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा घटकाचे वतीने दिनांक २७.१०.२०२५ ते दिनांक ०२. ११.२०२५ पावेतो भ्रष्टाचार निर्मुलन संदर्भाने दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, दक्षता सप्ताह दरम्यान ला.प्र.वि बुलढाणा घटकाकडून बुलढाणा येथील बस स्थानक, प्रशासकीय ईमारत, शासकीय व निमशासकीय कार्यालय येथे जनजागृतीची पत्रके लावण्यात आली, ला.प्र.वि.चे ब्रिदवाक्य असलेले बॅनर लावुन व हस्तपत्रके वाटप करुन जनतेमध्ये भ्रष्टाचार बाबत जनजागृती करण्यात आली.
एफएम सुरभी रेडीओ यावर भ्रष्टाचार निर्मुलन संबधाने नागरीकांना सरकारी कामाबद्दल जर कोणी लाच मागत असेल किंवा लाच मागण्याच्या उद्देशाने सरकारी काम विनाकारण अडवून ठेवत असेल तर विभागाच्या टोल फ्री कमांक १०६४, व्हाॅट्सअॅप क्रमांक ९४०५०९१०६४ यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान ३१ ॲाक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून शपथ घेण्यात आली.
बुलढाणा शहरामध्ये बसस्थानक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक या गर्दीचे ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलन संबंधी शाहीर डी. आर. इंगळे व त्यांचे सहकारी यांचे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. तसेच जनजागृती संबंधाने मराठी अभिनेते विजय पाटकर, सचिन गोस्वामी, श्याम राजपुत तसेच यु ट्युबर धनश्री पाटील, श्वेता महाजन यांच्या चित्रफितीद्वारे आवाहन प्रदर्शित करण्यात आले. तसेच सोशल मिडीयाद्वारे जनजागृतीपर व्हीडीओ, पोष्टर्स, बॅनर व जनजागृतीचे फोटो प्रसारीत करुन जनजागृती करण्यात आली.
जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रबिंधक विभाग, बुलढाणा यांच्या कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८, टोल फ्री. १०६४ किंवा व्हाट्स अॅप कमांक ९४०५०९१०६४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक भागोजी चोरमले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.






