
शेगावात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन
शेगांव :-येथील महात्मा फुले उत्सव समिती, फुले नगर (माळीपुरा) यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेली भव्य व शिस्तबद्ध मोटारसायकल रॅली संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली. या रॅलीत समाजातील सर्व घटकांतील नागरिकांसह महिला भगिनींचा उत्स्फूर्त व लक्षणीय सहभाग लाभला.
दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. याच परंपरेनुसार यंदाही सावित्रीबाई फुले चौक, फुले नगर (माळीपुरा) येथून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याची आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. यासोबतच समाजप्रबोधन करणारे विविध देखावे सादर करण्यात आले. लहान बालकांनी सादर केलेल्या देखाव्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
ही भव्य रॅली शहरातील प्रमुख चौक व मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाली.
आई सावित्रीबाई फुले चौक, तीन पुतळे परिसर, जुने महादेव मंदिर, सावता महाराज चौक, संविधान चौक, क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक, मंदिर परिसर, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रेशन चौक, बस स्टँड, स्वामी विवेकानंद स्कूल, श्रीराम नगर, संभाजी महाराज चौक, मुरारका हायस्कूल चौक, आनंद विसावा, दसरा नगर, गणेश नगर या मार्गाने ही रॅली मार्गस्थ होत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे निरोप समारंभाने समारोप करण्यात आला.
सायंकाळी जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांच्या वतीने समाजप्रबोधनात्मक भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले चौक, फुले नगर (माळीपुरा) येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोविंद महाराज गायकवाड यांनी आपल्या परखड, विनोदी व प्रभावी शैलीतून समाजातील विविध प्रश्न, अन्याय, अंधश्रद्धा व सामाजिक वास्तवावर भाष्य करत उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. पारंपरिक भारूडाच्या माध्यमातून केलेले हे समाजप्रबोधन नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत अनुभवले. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमापूर्वी महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने शेगाव शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी परिषदेचे अध्यक्ष राजेश आसोलकर हे होते. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शशिकांत घाटोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन महात्मा फुले उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मानले.






