Home महाराष्ट्र अखेर बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल; शिवसेनेच्या आंदोलनाला यश

अखेर बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल; शिवसेनेच्या आंदोलनाला यश

8
0

शेगाव | प्रतिनिधी
तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी शिवसेनेने तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांचे नेतृत्वात सर्वप्रथम स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. आंदोलनानंतर तालुका कृषी अधिकारी चोपडे व कृषी विभागाच्या पथकाने बाधित शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे केले. त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उगवण न झालेल्या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात रवी सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि बूस्टर प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर दोषी बियाणे कंपन्यांवर ही कारवाई झाल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे मानले जात आहे.
आता दोषी कंपन्यांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याबरोबरच बाधित शेतकऱ्यांना कृषी विभाग व शासनाकडून किती आणि कसा मोबदला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी”
“जिल्ह्यात सर्वप्रथम तालुका शिवसेनेने हा प्रश्न उचलून कृषी कार्यालयासमोर आंदोलन करून, कृषी अधिकाऱ्यांना बांधावर घेऊन जात पंचनामे सुद्धा करून घेऊन,त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अन्य समस्याही शिवसेनेकडे मांडाव्यात. त्यांच्या न्यायासाठी आम्ही सातत्याने लढा देत राहू.”
– रामा पाटील थारकर,
तालुका शिवसेनाप्रमुख, शेगाव


500 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित
रवी सीड प्रायव्हेट लिमिटेड (उन्नती वाण) संदर्भात 310 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून सुमारे 1,100 बॅग बियाण्यांची उगवण न झाल्याची नोंद आहे. यामुळे सुमारे 400 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
बूस्टर प्रायव्हेट लिमिटेड संदर्भात 57शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या असून सुमारे 150 बॅग बियाण्यांबाबत तक्रारी आहेत.
एकूण मिळून तालुक्यात जवळपास 525 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Previous articleसाखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाची केंद्रीय आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली पाहणी
Next articleराष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलैला बुलढाण्यात प्लेसमेंट ड्राईव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here