Home महाराष्ट्र राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलैला बुलढाण्यात प्लेसमेंट ड्राईव्ह

राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलैला बुलढाण्यात प्लेसमेंट ड्राईव्ह

14
0

बुलढाणा, दि. २० (जिमाका) : केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय करिअर सेवा (National Career Service) पोर्टलच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त २० ते २४ जुलै २०२६ या कालावधीत “NCS पोर्टल लाँच वीक” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या वतीने दि. २२ जुलै २०२६ रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

ही प्लेसमेंट ड्राईव्ह सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, तळ मजला, प्रशासकीय इमारत, बसस्थानकासमोर, बुलढाणा येथे होणार असून रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र युवक-युवतींना विविध नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये दास ग्रुप ऑफ कंपनी आणि क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड, बुलढाणा या आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. दास ग्रुप ऑफ कंपनीमध्ये फील्ड ऑफिसर व असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी एकूण ९ जागा उपलब्ध असून किमान १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना रु. १५ हजार वेतनासह पेट्रोल भत्ता देण्यात येणार आहे. तर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेडमध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजर पदासाठी ३० जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी १२ वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र उमेदवारांकडे दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १६ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन मिळणार असून नियुक्ती बुलढाणा, चिखली, मोताळा आणि मलकापूर परिसरात केली जाणार आहे.

रोजगार इच्छुक उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे पूर्वनोंदणी करून २२ जुलै रोजी मूळ शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत घेऊन उपस्थित राहावे. या प्लेसमेंट ड्राईव्हचा अधिकाधिक पात्र युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

Previous articleअखेर बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल; शिवसेनेच्या आंदोलनाला यश
Next articleउल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार; १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here