Home महाराष्ट्र #शेगावात ‘व्हाईस ऑफ मीडिया’ व ‘गो ग्रीन फाउंडेशन’तर्फे वृक्षारोपण

#शेगावात ‘व्हाईस ऑफ मीडिया’ व ‘गो ग्रीन फाउंडेशन’तर्फे वृक्षारोपण

25
0

स्वातंत्र्यदिनी पर्यावरणाचा केला जागर

मान्यवरांच्या उपस्थितीत तुलसीनगर व मंगलम् नगर परिसरात उपक्रम
शेगाव : केवळ ‘झाडे लावा, झाडे जगवा’च्या घोषणा देत फोटोसेशनपुरते वृक्षारोपण करण्याच्या प्रथेपासून दूर जात, प्रत्यक्ष वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा आदर्श शेगावात निर्माण करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ‘व्हाईस ऑफ मीडिया’ आणि ‘गो ग्रीन फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने तुलसीनगर व मंगलम् नगर परिसरातील ओपन स्पेसमध्ये विविध देशी व औषधी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.
या प्रेरणादायी उपक्रमाला तहसीलदार प्रज्ञा काकडे, शहर ठाणेदार निमिष मेहेत्रे आणि ग्रामीण ठाणेदार प्रवीण लिंगाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, ओपन स्पेसच्या कंपाऊंडलगत लावण्यात आलेल्या वृक्षांच्या नियमित संवर्धन व संगोपनाची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता ‘झाडे लावा आणि ती जगवा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शेगाव परिसरात ‘गो ग्रीन फाउंडेशन’ गेल्या सात वर्षांपासून सातत्याने हिरवाई निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. संस्थेने आतापर्यंत तब्बल १० हजार झाडांचे यशस्वी संगोपन केले असून, नऊ नयनरम्य वनांची निर्मिती केली आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेली ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही संघटनाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असल्याचे या वृक्षारोपणातून अधोरेखित झाले.
यावेळी गो ग्रीन फाउंडेशनचे डॉ. अतुल पाटील, डॉ. पी. एम. भुतडा, रमेश चांडक, डॉ. अभय गोयनका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रदीप मसने, टीव्ही अँड डिजिटल मीडियाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास, ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील, शहराध्यक्ष दिनेश महाजन, महेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष सतीश अग्रवाल, रवी शेगोकार, समीर शेख, दिनेश घाटोळ, मोहम्मद रिजवान, समीर देशमुख, ललित देवपुजारी, प्रशांत खत्री यांच्यासह ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी व सदस्य, गो ग्रीन फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल अवताडे यांनी केले, तर गो ग्रीनचे माजी रेल्वे अधिकारी श्री. साबे सर यांनी आभार मानले.
‘ओंकार वन’ला मान्यवरांची भेट
वृक्षारोपणानंतर उपस्थित मान्यवरांनी गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने स्व. ओमप्रकाशजी गोयनका यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारण्यात आलेल्या ‘ओंकार वन’ला प्रत्यक्ष भेट दिली. गौरक्षण संस्थान, शेगाव यांनी वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर साकारलेले हे निसर्गरम्य वन पाहून तहसीलदार प्रज्ञा काकडे तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी गो ग्रीन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याचे भरभरून कौतुक करीत व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्याची पण प्रशांशा केली
पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी : तहसीलदार प्रज्ञा काकडे
गो ग्रीन फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करताना तहसीलदार प्रज्ञा काकडे म्हणाल्या, विकासाच्या रेट्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना अशा प्रकारे सातत्याने वृक्षलागवड व संवर्धन करणे ही अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
चौकट:– ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ८० झाडे जगविण्याचा संकल्प
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ आणि ‘गो ग्रीन फाउंडेशन’तर्फे वर्षभरात ८० झाडे लावून ती १०० टक्के जगविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आजच्या वृक्षारोपण उपक्रमाने या हरित संकल्पाची यशस्वी सुरुवात झाली आहे,अशी माहिती ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील यांनी दिली.

Previous articleहर घर तिरंगा २०२६’ अंतर्गत बुलढाण्यात भव्य तिरंगा रॅली; ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन
Next articleजिल्हा युवा पुरस्काराने सुरज बोरसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here