
शेगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२४-२५ चा जिल्हा युवा पुरस्कार शेगाव येथील मेरा युवा भारतचे माजी स्वयंसेवक तथा नेहरू युवा मंडळ भोनगावचे अध्यक्ष सुरज मार्तंडराव बोरसे यांना स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांच्या हस्ते सुरज मार्तडराव बोरसे यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, पोलीस अधीक्षक निवृत्ती तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना असंघटित युवकांना संघटित करणे, युवक व नागरिकांमधील सुप्त गुणांना वाव देणे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी भरीव योगदान देणे, या कार्याची दखल घेत सुरज बोरसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरज बोरसे यांनी यापूर्वीही विविध स्तरांवर आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडली आहे. नेहरू युवा केंद्राच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस. रामामूर्ती यांच्या हस्तेही त्यांना गौरविण्यात आले होते.



