शेगाव, दि. 21 ऑगस्ट 2026 : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे पोलीस सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. रेल्वे प्रवासादरम्यान हरविलेला मोबाईल फोन रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे शोधून काढून संबंधित प्रवाशास परत करण्यात आला.
प्रवासी सिमरजीत सिंग तरणसिंग सहानी, वय 32 वर्षे, रा. प्लॉट नं. 2, शंकर कॉम्प्लेक्स, रामदास पेठ, अकोला हे महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत असताना त्यांचा Vivo Y-35 कंपनीचा मोबाईल फोन रेल्वे स्थानक शेगाव हद्दीत कुठेतरी पडून हरवला होता.
सदर बाबत माहिती प्राप्त होताच रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथील पोलीस शिपाई क्र. 305 ऋषिकेश जवळकर यांनी तत्परतेने मोबाईलचा शोध सुरू केला. अथक प्रयत्न करून सदर हरविलेला मोबाईल फोन शोधून काढण्यात त्यांना यश आले.
त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून सदर मोबाईलची पावती घेण्यात आली व हरविलेला मोबाईल संबंधित प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आला.
आपला मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने प्रवासी सिमरजीत सिंग सहानी यांनी रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सदर कार्यवाहीबाबत रेल्वे पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
रेल्वे पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीमुळे प्रवाशाचा मौल्यवान मोबाईल त्यास पुन्हा मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या मौल्यवान वस्तूंच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलीस सदैव तत्पर आहेत, असा विश्वास निर्माण झाला आहे.
सदरची कार्यवाही रेल्वे पोलीस ठाणे शेगावचे प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई क्र. 305 ऋषिकेश जवळकर यांनी केली.




