
शेगाव येथे दिनांक 20/07/2026 रोजी जलंब रेल्वे स्थानकावरील मेन लाईनवर एक महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उभी असल्याची माहिती जलंब येथील PWI यांनी रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथे दिली. माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार पांडुरंग वसु यांनी तात्काळ सहायक फौजदार सुनील कवळकर, पोलीस अंमलदार किरण डोके व बबन शिरसाट यांना शासकीय वाहनासह घटनास्थळी रवाना केले.
रेल्वे पोलीस पथकाने अत्यंत तत्परतेने जलंब रेल्वे स्थानकावर पोहोचून मेन लाईनवर उभ्या असलेल्या महिलेला सुरक्षितपणे बाजूला करून तिचा जीव वाचविला. त्यानंतर सदर महिलेला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथे आणण्यात आले.
चौकशीदरम्यान सदर महिलेने तिचे नाव कविता देवी उमेश कुशवाह, वय 24 वर्षे, रा. सुखलहिया एवढीच माहिती दिली. ती केवळ बिहारी भाषेत बोलत असल्यामुळे तिच्याकडून अधिक माहिती मिळविणे अत्यंत कठीण झाले.
अशा परिस्थितीत रेल्वे पोलीस ठाणे, शेगावचे *प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात व पोलीस हवालदार पांडुरंग वसु यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याचा संयमाचा व प्रभावी संवाद कौशल्याचा वापर करून महिलेची संपूर्ण माहिती मिळविली. अथक प्रयत्नांनंतर तिचा संपूर्ण पत्ता पोलीस चौकी हरपूर, थाना अदापूर, जिल्हा मोतिहारी, बिहार असा शोधून काढण्यात आला.
त्यानंतर संबंधित स्थानिक पोलिसांशी तात्काळ समन्वय साधून महिलेच्या आई-वडिलांचा व पतीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविण्यात आला. तिचे पती उमेश प्रसाद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी आपल्या पत्नीला घेण्यासाठी शेगाव कडे रवाना झाल्याचे सांगितले.
महिलेच्या पतीला शेगाव येथे पोहोचण्यास विलंब होणार असल्याने तिच्या सुरक्षिततेचा विचार करून सदर महिलेला सखी वन स्टॉप सेंटर, बुलढाणा येथे प्रशासकांच्या ताब्यात सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे, संवेदनशीलतेमुळे आणि प्रभावी समन्वयामुळे एका महिलेचा अमूल्य जीव वाचला असून, तिच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन तिला सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यवाहीबद्दल रेल्वे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
*सदरची कार्यवाही
पोलीस अधीक्षक, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर श्री. संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार सुनील कवळकर, पोलीस हवालदार पांडुरंग वसु, पोलीस अंमलदार किरण डोके,बबन शिरसाट व महिला पोलीस शिपाई सुलोचना कांबळे यांनी अत्यंत तत्परतेने व कौशल्यपूर्णरीत्या यशस्वीरीत्या पार पाडली.
“वेळीच मिळालेली माहिती, पोलिसांची तत्परता आणि संवेदनशील हस्तक्षेप यामुळे एका महिलेचा अमूल्य जीव वाचला आणि तिचे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला.

