
संतनगरी शेगाव : बालकामगार प्रथेला आळा घालण्यासाठी शेगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत खामगाव-शेगाव रोडवरील एका वेल्डिंग वर्कशॉप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आस्थापनावर दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचे तपासणीदरम्यान उघड झाले.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट्स अँड वेल्डिंग वर्क, खामगाव-शेगाव रोड येथे २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजता तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित वर्कशॉपमध्ये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाले.
या प्रकरणी शेख वसीम शेख करीम (वय ४०, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 146 तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 मधील कलम 75 व 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई श्रीमती दिपाली आशिष अडावतकर (वय ५०), दुकाने निरीक्षण श्रेणी-दोन, सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
बालपण हे शिक्षण, खेळ आणि विकासासाठी असताना अल्पवयीन मुलांकडून काम करून घेणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे. या प्रकरणाची नोंद पोहेका विनायक सरोदे यांनी केली असून, पुढील तपास पोहेका निलेश गाडगे करीत आहेत.
बालहातांना काम नाही, शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे! — शेगाव पोलिसांचा कठोर संदेश

