
जयघोषाने शेगाव दुमदुमले/श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तीचा महासागर! ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद
शेगाव, प्रतिनिधी :
संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित ११६ वा श्री पुण्यतिथी उत्सव यंदाही अभूतपूर्व भक्तिभाव, शिस्त आणि अध्यात्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या उत्सवाने संपूर्ण शेगाव नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ३९७ दिंड्यांचा सहभाग आणि तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण ही या उत्सवाची भव्यता अधोरेखित करणारी ठरली.
श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थान परिसरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, त्यानंतर ७.३० ते ९ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी भाविकांना अध्यात्मिक मेजवानी मिळाली.
नामस्मरणाने शेगाव नगरी दुमदुमली
उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी), ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी), ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) यांच्यासह विविध कीर्तनकारांनी उपस्थित भाविकांना भक्ती, अध्यात्म आणि संतपरंपरेचा संदेश दिला. कीर्तन, भजन आणि हरिपाठाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
गणेशयाग-वरुणयागाची पूर्णाहुती
श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शु. १ रोजी प्रारंभ झाला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाद्रपद शु. ४ रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त विशेष श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३९७ दिंड्यांनी लावली भक्तीची हजेरी
यंदाच्या पुण्यतिथी उत्सवात तब्बल ३९७ दिंड्यांनी श्रींच्या सेवेत सहभाग घेतला. नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना संस्थानतर्फे १० टाळ, १ वीणा, १ मृदंग यासह श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा आणि श्री एकनाथी भागवत हे संत वाङ्मय तसेच श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या.
जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहकार्य देण्यात आले. त्यामुळे वारकरी परंपरेला बळ देण्याचे कामही संस्थानच्या माध्यमातून करण्यात आले.
वारकऱ्यांसाठी भोजन, प्रथमोपचाराची सुविधा
उत्सवासाठी आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत विसावा संकुल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सेवाभावाची परंपराही संस्थानने जपली.
१ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद
उत्सव काळात शेगावसह विविध ठिकाणी श्रींचा समाधी उत्सव संपन्न झाला. पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, जिरडा आदी ठिकाणीही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून १ लाख १० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
चार दिवसांच्या या भक्तिमय सोहळ्याने श्री गजानन महाराज संस्थानची भक्तसेवा, वारकरी परंपरा आणि अध्यात्मिक कार्याची व्यापकता पुन्हा एकदा अधोरेखित केली. शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका, दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि हजारो भाविकांची सेवा यामुळे यंदाचा पुण्यतिथी उत्सव संस्मरणीय ठरला. “गण गण गणात बोते” या जयघोषाने शेगावची संतभूमी भक्तीच्या ऊर्जेने भारावून गेली.
— श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव





