Home महाराष्ट्र मोबाईल चार्जिंगला लावून झोपणे पडले महाग; GRP शेगावने तांत्रिक तपासातून चोरीचा गुन्हा...

मोबाईल चार्जिंगला लावून झोपणे पडले महाग; GRP शेगावने तांत्रिक तपासातून चोरीचा गुन्हा उघड केलाअमरावती येथून चोरीस गेलेला मोबाईल जप्त; प्रवाशांनी सतर्क राहण्याचे GRP चे आवाहन

11
0

शेगाव 18 जुलै – रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चार्जिंगला लावून निष्काळजीपणे झोपणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव यांनी प्रभावी कारवाई करत आणखी एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे.

दिनांक 06/06/2026 रोजी फिर्यादी संदीप प्रभाकर मुळे हे आपल्या कुटुंबासह शेगाव येथे देवदर्शनासाठी आले होते. भक्तनिवास येथे मुक्काम करून देवदर्शन आटोपल्यानंतर दिनांक 08/06/2026 रोजी घरी परत जाण्यासाठी ते रेल्वे स्टेशन शेगाव येथील बुकिंग कार्यालयात आले. रेल्वेगाडी येण्यास वेळ असल्याने आणि मोबाईलची बॅटरी कमी असल्याने त्यांनी आपला रेडमी-9 कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल (किंमत रु. 13,200/-) चार्जिंग पॉईंटला लावला. याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सदर मोबाईल चोरी केला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान मोबाईलचे लोकेशन अमरावती येथे मिळून आले. त्यानुसार अमरावती येथे जाऊन आरोपीचा शोध घेण्यात आला व त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

याबाबत प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन करताना सांगितले की, रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी मोबाईल चार्जिंगला लावून बुकिंग कार्यालय किंवा प्लॅटफॉर्मवर झोपतात. अशा निष्काळजीपणाचा फायदा चोरटे घेत असल्याने मोबाईल, दागदागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू स्वतःजवळ सुरक्षित ठेवाव्यात आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे.

रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव यांनी गेल्या दोन महिन्यांत मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे तांत्रिक तपासाच्या सहाय्याने उघडकीस आणत चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत केले असून अनेक मोबाईल चोरट्यांना गजाआड केले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस सातत्याने दक्ष असून अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई भविष्यातही सुरू राहणार आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते व रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous articleसोशल मीडियाच्या माध्यमातून घरातून निघालेली मुलगी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित; दोन्ही युवक-युवती पालकांच्या ताब्या
Next articleजनता दरबारात तक्रारींचा ऑन-द-स्पॉट निपटारा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here