Home महाराष्ट्र वरवट बकाल येथे १४ ऑगस्टला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह

वरवट बकाल येथे १४ ऑगस्टला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह

28
0

बुलढाणा,दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वरवट बकाल यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संग्रामपूर रोड, वरवट बकाल, ता. संग्रामपूर येथे होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात श्रीराम फायनान्स खामगाव, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड संग्रामपूर, दास गॅस इक्विपमेंट्स खामगाव, तसेच टाटा मोटर्स पुणे या नामांकित खासगी कंपन्यांनी विविध पदांसाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. टाटा मोटर्सकडून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून डिजिटल श्रम संकल्प, आयडिएथॉन-हॅकेथॉन, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS), इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ तसेच जागतिक कौशल्य स्पर्धा २०२८ आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना (CMYKPY) याबाबत नोंदणी व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मेळाव्यात सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय तसेच पदवीधर पुरुष व महिला उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहून नावनोंदणी करावी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर मुलाखत द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व रोजगार इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तळमजला, बसस्थानकासमोर, बुलढाणा येथे किंवा ०७२६२-२४२३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous articleसोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
Next articleबुलढाण्यात १४ ऑगस्टला जिल्हा गुंतवणूक परिषद; उद्योग व रोजगाराच्या नव्या संधींना चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here