Home महाराष्ट्र नांदुरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या गर्भवती महिलेचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध; लोहमार्ग...

नांदुरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या गर्भवती महिलेचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध; लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात केले सुपूर्द

10
0

शेगाव, दि. 29 जुलै : लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे दाखल मनुष्य मिसिंग क्र. 03/2026 मधील हरवलेली महिला वय 24 वर्ष हिचा अवघ्या काही दिवसांत तांत्रिक तपास, सोशल मीडियाचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले असून, तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दिनांक 20/07/2026 रोजी सदर महिला तिच्या सासऱ्यांसमवेत अमरावती–सुरत एक्सप्रेसने शेगाव ते सुरत असा प्रवास करीत असताना नांदुरा रेल्वे स्थानकावर सासऱ्यांची नजर चुकवून रेल्वेतून उतरून निघून गेली होती. त्यानंतर तिचा कोणताही संपर्क होत नसल्याने लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे मनुष्य मिसिंग दाखल करून तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान सदर महिला प्रथम देऊळगाव मही, जि. बुलढाणा येथे तिच्या मैत्रिणीकडे गेल्याचे निष्पन्न झाले. तेथून ती जालना रेल्वे स्थानकावरून नाशिक येथे गेली. स्वतःचा माग लागू नये म्हणून तिने जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घेतले तसेच अशोकनगर, सातपूर, नाशिक येथे भाड्याने खोली घेऊन एका मॉलमध्ये काम करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली.

सदर महिला गर्भवती असल्यामुळे तिचा तात्काळ शोध घेणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार पोलीस हवालदार 460 गजानन मेटांगे यांनी महिलेच्या मोबाईलचे CDR, लोकेशन, Instagram व इतर सोशल मीडिया खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवले. त्याचबरोबर कॉल डिटेलमधून तिच्या एका मैत्रिणीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तिच्याशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीस संबंधित मैत्रिणीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तांत्रिक पुरावे, गोपनीय माहितीदारांकडून मिळालेली माहिती आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे सदर महिला अशोकनगर, सातपूर, नाशिक येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दिनांक 28/07/2026 रोजी पोलीस हवालदार 460 गजानन मेटांगे, पोलीस हवालदार 379 राम मोहेकर यांनी नाशिक येथे जाऊन सदर महिलेचा शोध घेऊन तिला सातपूर पोलीस ठाणे, नाशिक येथे आणले. चौकशीदरम्यान तिने कौटुंबिक कारणांमुळे तसेच आई-वडील रागावतील या भीतीमुळे घरातून निघून गेल्याचे सांगितले.

त्यानंतर सातपूर पोलीस ठाणे येथे तिची तिच्या आईसोबत भेट घडवून आणण्यात आली. अनेक दिवसांनंतर झालेल्या या भेटीत आई व मुलीने एकमेकींना घट्ट मिठी मारत अश्रूंनी भावना व्यक्त केल्या. उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यांत हा प्रसंग पाहून आनंदाश्रू तरळले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर महिलेस तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

या यशस्वी कार्यवाहीबद्दल महिलेच्या पालकांनी लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रभारी अधिकारी श्री. विवेकानंद राळेभात यांचा संदेश

“आजच्या धावपळीच्या जीवनात घरातील छोट्या-छोट्या मतभेदांचे रूपांतर अनेकदा गंभीर परिस्थितीत होते. पालकांचे रागावणे हे मुलांच्या हितासाठी असते, तर मुलांनीही क्षणिक राग, गैरसमज किंवा भीतीपोटी घर सोडण्याचा निर्णय घेऊ नये. अशा एका निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक वेदना, असुरक्षितता आणि चिंतेत सापडते.

कोणतीही समस्या संवादाने सोडवता येते. त्यामुळे पालक आणि मुलांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधावा, एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात आणि रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेणे टाळावे. प्रत्येक कुटुंबातील संवाद हा नातेसंबंध टिकविण्याचा सर्वात मोठा आधार आहे.

‘ एक क्षणाचा राग आयुष्यभराचे दुःख ठरू शकतो; परंतु एक प्रेमळ संवाद संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकत्र आणू शकतो.'”

सदर उल्लेखनीय कार्यवाही पोलीस अधीक्षक, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर श्री. संदीप पालवे , उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड श्री. वसंत भोये तथा प्रभारी अधिकारी, लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव श्री. विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 460 गजानन मेटांगे, पोलीस हवालदार 379 राम मोहेंकार व पोलीस हवालदार 522 किरण आघाव यांनी तांत्रिक तपास, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर यशस्वीरित्या पार पाडली.

Previous articleलोहमार्ग पोलीस शेगावची उत्कृष्ट कामगिरी; चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करून आरोपीला अटक
Next articleदलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी तात्काळ खर्च करा — रामा पाटील थारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here