Home महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार; १०...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार; १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

13
0

बुलढाणा, दि. २० (जिमाका) : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांना सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १० सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी कला क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच पूर, आग, दरोडा, अपघात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये धाडसी व बहुमोल कार्य करणारे आणि देश व राज्याची प्रतिष्ठा उंचावेल असे लक्षणीय योगदान देणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी किंवा पाल्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी २५ हजार रुपये, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी ५० हजार रुपये इतका विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाकडून प्रदान केला जाणार आहे. याशिवाय, इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण तसेच बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांनाही २० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

पात्र माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज १० सप्टेंबर २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलैला बुलढाण्यात प्लेसमेंट ड्राईव्ह
Next articleएन.व्ही. चिन्मयानंद विद्यालय येथे अमली पदार्थ जनजागृती व सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here