Home महाराष्ट्र अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा आणि ब्रह्मज्ञानाचा संदेश देणाऱ्या मुक्ती पर्वाचे भव्य आयोजन

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा आणि ब्रह्मज्ञानाचा संदेश देणाऱ्या मुक्ती पर्वाचे भव्य आयोजन

34
0

मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती
– निरंकारी सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज

शेगांव (प्रतिनिधी) संपूर्ण भारत स्वातंत्र्यदिन , राष्ट्रभक्ती, अभिमान आणि उत्साहाने साजरा करीत असताना संत निरंकारी मिशनच्या वतीने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यांपासून मुक्त होऊन आत्मबोध आणि परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, हा संदेश या पर्वातून अधोरेखित करण्यात आला.

मुक्ती पर्वाचा हा पावन समागम ,परम श्रद्धेय सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात दिल्ली येथील निरंकारी सरोवरासमोरील ग्राउंड क्रमांक २, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विदेशातील व्यापक कल्याणकारी प्रचार यात्रेच्या यशस्वी समारोपानंतर ,प्रदीर्घ कालावधीनंतर सत्गुरूंचे पावन दर्शन लाभल्याने दिल्ली-एनसीआरसह विविध भागांतून आलेले हजारो श्रद्धाळू भक्त भावविभोर झाले.

या प्रसंगी श्रद्धाळूंना संबोधित करताना सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी सांगितले की, खरी मुक्ती बाह्य बंधनांतून नव्हे, तर द्वेष, अहंकार, संकुचित विचारसरणी आणि पूर्वग्रह यांपासून मुक्त होण्यात आहे. प्रत्येक श्वासात निराकार परमात्म्याची अनुभूती ठेवून प्रेम, भक्ती आणि स्वीकारभावाने जीवन जगणे म्हणजेच जीवनात असतानाच मुक्तीचा अनुभव घेणे होय.

सत्गुरू माताजी यांनी माता सविंदरजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेत ‘दीपस्तंभा’चे उदाहरण देत सांगितले की, परिस्थिती कोणतीही असो, अंतर्मनातील शांतता, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव तेवत ठेवला पाहिजे. संतांच्या शिकवणी केवळ ऐकणे नव्हे, तर त्यांचे विचार, आचरण करने आणि जीवनात प्रत्यक्ष अवलंब करणे, हीच खरी साधना आणि मुक्तीचा मार्ग आहे.

या पावन सत्संगात श्रद्धाळू भक्तांनी मानवतेला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करणाऱ्या महान संत विभूतींना श्रद्धापूर्वक नमन करून श्रद्धासुमने अर्पण केली. संत निरंकारी सत्संग भवन शेगांव येथे सुर्यकांतजी कोळी ज्ञानप्रचारक मुंबई यांचे उपस्थिती मध्ये सत्संगाचा लाभ वरीष्ठ पत्रकार अमरभाऊ बोरसे, सतिषभाऊ अग्रवाल व दत्ताभाऊ तायडे यांचेसह खूप भाविक भक्तांनी घेतला तसेच जगभरातील मिशनच्या विविध शाखांमध्येही ‘मुक्ती पर्वा’निमित्त विशेष सत्संगाचे आयोजन करून या महान संत विभूतींचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे, ‘मुक्ती पर्वा’ची सुरुवात १९६४ मध्ये जगत माता बुद्धवंती जी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ झाली. १९६९ मध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी यांच्या ब्रह्मलीन होण्यानंतर हा दिवस ‘शहनशाह-जगत माता दिवस’ म्हणून श्रद्धापूर्वक साजरा केला जाऊ लागला. पुढे १९७९ मध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान संत लाभ सिंहजी यांच्या स्मृतीचाही या दिवसाशी संबंध जोडण्यात आला तदोपरांत बाबा गुरबचन सिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ म्हणून प्रतिष्ठित केले. या प्रसंगी निरंकारी राजमाताजी यांच्या भक्तिमय जीवनाचा तसेच त्यांनी दिलेल्या अमूल्य शिकवणींचाही उल्लेख करण्यात आला.

२०१८ पासून युगनिर्माता माता सविंदरजी यांनाही या प्रसंगी श्रद्धापूर्वक नमन करण्यात येते. वात्सल्य, विनम्रता, त्याग आणि निःस्वार्थ सेवेने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन श्रद्धाळू भक्तांसाठी सदैव प्रेरणा, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत राहील. तसेच सत्गुरू माता जी यांनी हा पावन दिवस मिशन आणि मानवतेच्या सेवेसाठी तन, मन आणि जीवन निःस्वार्थ भावनेने समर्पित करणाऱ्या सर्व अनन्य भक्त आणि समर्पित सेवादारांप्रति कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम बनविले.

निःसंशय, मुक्ती पर्वाचा मूलभूत संदेश हाच आहे की, ज्या प्रकारे भौतिक स्वातंत्र्य , राष्ट्राच्या प्रगती आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देत प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनेच्या पवित्र मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देते.

Previous articleभीमगर्जना राष्ट्रभूषण पुरस्कार 2026 द्वारे संत निरंकारी मिशन सन्मानित
Next articleCEIR पोर्टलच्या तांत्रिक तपासातून रेल्वे प्रवाशाचा चोरीस गेलेला महागडा मोबाईल शोधला; आरोपीस अटक करून 2,03,999/- रु. 7 मोबाईल जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here