बुलढाणा, दि. ११ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाबाबत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक असणे व वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर निर्धारित संख्येपेक्षा अधिक मतदार असल्यास आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांचे विभाजन करून नवीन मतदान केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदान केंद्र तयार करताना शक्य तितक्या जास्त भागाचे समायोजन जवळच्या मतदान केंद्रात केल्यानंतरच नवीन मतदान केंद्र तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.



